
मुंबईकरांना खरोखरच सावध व्हावे लागेल अशी बातमी आहे. मुंबईत कोरोना वाढू लागला आहे. 6 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मुंबईतील कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 500 वर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत 506 नवे रुग्ण आढळले.
एप्रिलपेक्षा चालू मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा 6 फेब्रुवारी रोजी मुंबईत 536 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर 114 दिवसांनंतर आज 500 च्या वर रुग्णसंख्या गेली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार 98 टक्के आहे.
मे महिन्यात मुंबईत कोरोनाचे एकूण 5979 रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात ही संख्या 1822 इतकी होती. एप्रिलमध्ये कोरोनामुळे चार जण, तर मे महिन्यात तीन जण दगावले. मुंबईत सध्या 24,472 कोरोनो बेड उपलब्ध आहेत. त्यातील 90 बेडवर उपचारासाठी रुग्ण दाखल आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 2355 दिवस आहे.
राज्यात 24 तासांत 711 रुग्ण, एकाचा मृत्यू
राज्यातही आज 711 नवे रुग्ण आढळले. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आहे. सोमवारी 431 रुग्ण आढळले होते. चोवीस तासांत त्यात 310 नव्या रुग्णांची भर पडली. दुर्दैवाने आज नाशिकमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात 782 नवे रुग्ण आढळले होते. नंदुरबार, धुळे, जालना, लातूर, अकोला, बुलढाणा आणि गोंदिया जिह्यात आज एकही कोरोनाबाधित आढळला नाही. कोरोनावर मात केलेल्या 366 रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के इतकी असून मृत्युदर 1.87 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सध्या राज्याच्या विविध जिह्यांमध्ये कोरोनाचे 3475 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक 2526 रुग्ण हे मुंबईतील असून ठाण्यात 413 तर पुण्यात 297 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.

























































