
आंतरवाली सराटीच्या वेशीवर आता ओबीसी समाजानेही उपोषण सुरू केले. ओबीसी समाजाचे आंदोलक अॅड. मंगेश ससाने, विठ्ठल तळेकर आणि सतीश कुलाल यांनी उपोषण सुरू केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या या संविधानिक नसून, आमच्या हक्कांवर गदा येत आहे. अवघे मंत्रिमंडळ मनोज जरांगे यांना पायघड्या घालत आहेत. एका आडमुठ्या माणसामुळे अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजात घुसखोरी आता खपवून घेतली जाणार नसून आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशारा अॅड. मंगेश ससाणे यांनी दिला आहे. हे सरकार ओबीसींचे नुकसान करत आहे. मंत्री मराठा मनोज जरांगे यांना पायघड्या घालत आहे. ओबीसीचे आरक्षण अबाधित राहावे याकरिता शांततेत आंतरवाली सराटी रस्त्यावर सोनियानगर येथे सकल ओबीसी समाजाचे आंदोलक अॅड. मंगेश ससाने, प्रा. विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल, दत्तात्रय पवार सहकाऱ्यांनी रविवार, 6 सप्टेंबरपासून उपोषण चालू केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ओबीसींवरती अन्याय होत आहे हे आम्ही सहन करणार नाही. मागच्या दरवाजामधून कुणबी दाखले काढले जात असतील तर आमचे आरक्षण धोक्यात येऊन नुकसान होईल. सरकारने घाईगडबडीत कुणबी दाखले देण्याची गडबड करू नये. याला आमचा विरोध आहे, असेही अॅड. मंगेश ससाने म्हणाले.
उपोषणाचे स्टेज उभारण्यास पोलिसांचा नकार
ओबीसी समाजाच्या आमरण उपोषणासाठी स्टेज उभारण्यास पोलिसांनी यावेळी नकार दिला आहे. त्याचबरोबर उपोषणाचे ठिकाण इतरत्र हलवावे, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटीच्या वेशीवर आमरण उपोषण सुरू आहे. या ठिकाणी उपोषणाचे स्टेज उभारण्याची तयारी आंदोलकांकडून करण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी स्टेज उभारण्यास परवानगी नाकारत उपोषण अन्य ठिकाणी हलवण्याची विनंती केली. मात्र न ऐकता स्टेज उभारून आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक अॅड. ससाने यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का?’ असा सवाल त्यांनी केला.
























































