
वरळी स्मशानभूमीतील जुनी विद्युत दाहिनी तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र युवासेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही जुनी विद्युत दाहिनी वाचवण्यात यश आले आहे. या दाहिनीला वाचवण्यासाठी युवासेनेने दिलेल्या निवेदनानंतर महापालिकेने ती दाहिनी तोडण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
वरळी स्मशानभूमीत आधीच पीएनजी गॅसच्या तीन भट्टय़ा कार्यान्वित आहेत आणि तिथे आणखी एक पीएनजी भट्टी प्रस्तावित आहे. त्यामुळे जुनी विद्युत दाहिनी तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र कोरोना काळासह अनेक वर्षांपासून या दाहिनीने नागरिकांना सेवा दिली आहे. तसेच रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गजांवरही येथेच अंत्यसंस्कार झाल्याचे नमूद करत युवासेनेने ती दाहिनी तोडू नये अशी मागणी युवासेनेने केली होती.
युवासेनेचे वरळी विधानसभा उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी महापालिकेच्या यांत्रिकी व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अभियंता प्रशांत पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत, ही दाहिनी तोडणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. यावेळी युवासेना युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील, शैलेश सिंह, रोहित पडेलकर, संजय सोनावणे आणि पोलीस निरीक्षक नीलेश भालेराव आदी उपस्थित होते.



























































