दोन्ही खुब्यांच्या एकाचवेळी केलेल्या शस्त्रक्रियेला मोठे यश, वेदना आणि त्रासातून रुग्णाची मुक्तता

खुब्याच्या त्रासाने ग्रासलेल्या सगळ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या रुग्णांना ठणठणीत करणाऱ्या एका शस्त्रक्रिया पद्धतीची सध्या वैद्यकीय क्षेत्रात खूप चर्चा सुरू आहे. खुब्यांची झीज झाल्याने रुग्णांना प्रचंड वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. अशा वेदना सहन करणाऱ्या एका रुग्णावर सिंगल स्टेज डायरेक्ट अँटेरिअर बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. म्हणजेच डॉक्टरांनी रुग्णावर एकाचवेळी दोन्ही खुब्यांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेच्या यशामुळे असंख्य रुग्णांना फायदा होणार आहे. भारतामध्ये जवळपास 30 ते 40 लाख लोकं अशी आहेत जी या वेदना सहन करत जगत असतात. या सगळ्यांसाठी ही शस्त्रक्रिया आशेचा एक किरण बनली आहे.

अँकलोजिंग स्पाँडीलॉसिसमुळे रुग्णांना भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. अँकलोजिंग स्पाँडीलॉसिस झालेल्या व्यक्तीच्या मणक्यावर वाईट परिणाम होतो. मणका कडक झाल्याने त्या व्यक्तीला मुक्तपणे हालचाल करणं फार कठीण होतं. काही रुग्णांचे खुबे झिजून निकामी होतात. अँकलोजिंग स्पाँडीलॉसिसमुळे हालचाल करणं रुग्णाला कठीण होतं, ज्यामुळे वेदना तर होतातच शिवाय त्या व्यक्तीला इतरही त्रासांना सामोरं जावं लागतं. आतापर्यंत या परिस्थितीवर मात करण्यासाठी ठराविक काळानंतर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया हा एकच पर्याय होता. मात्र या शस्त्रक्रिया किती यशस्वी होतील याची खात्री देता येत नव्हती याशिवाय रुग्णाला बरं होण्यासही वेळ लागत होता. मात्र नव्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे खुबा प्रत्यारोपण एकाचवेळी करणं अधिक सोपं झालं असून त्याचा रुग्णांना लवकर फायदा होतो.

सिंगल स्टेज डायरेक्ट अँटेरिअर बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही अत्यंत कुशल शल्यचिकीत्सकांद्वारे केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये दोन्ही खुब्यांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एकाचवेळी केली जाते. यामुळे वारंवार शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही आणि रुग्णाची प्रकृतीही झपाट्याने सुधारते. पूर्वी या त्रासातून मुक्तता करण्यासाठी रुग्णावर केल्या जाणाऱ्या दोन शस्त्रक्रियांमधील कालावधी बराच जास्त होता.एकाच वेळी दोन्ही खुब्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा रुग्णालयातील मुक्कामाचा कालवधीही कमी होण्यास मदत होते. साहजिकच आहे या नव्या पद्धतीमुळे रुग्णाला लवकर आराम पडण्यास मदत होते.

वोक्हार्ट रुग्णालयाचे नामांकीत शल्यचिकीत्सक डॉ.सुप्रित बाजवा यांनी या शस्त्रक्रियेबाबत बोलताना म्हटले की, “सिंगल स्टेज डायरेक्ट अँटेरिअर बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया खऱ्या अर्थाने क्रांतीकारी आहे असं म्हणता येईल. या शस्त्रक्रियेमुळे अँकलोजिंग स्पाँडीलॉसिसमुळे खुब्यांची झीज झालेल्या रुग्णांना तत्काळ दिलासा मिळण्यास मदत होते. डायरेक्ट अँटीरीअर (शस्त्रक्रियेसाठी पुढच्या बाजूने चीर देणे) पद्धती आणि एकाचवेळी दोन्ही खुबे प्रत्यारोपण करण्याच्या पद्धतीमुळे रुग्णांना पूर्वीप्रमाणे हालचाल करता येणं शक्य होतं. या रुग्णांची वेदनेतून सुटका होते आमि या रुग्णांचे एकूण जीवनमान सुधारण्यासही मदत होते. जुन्या पद्धतींपेक्षा या नव्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचे बरेच फायदे आहेत. ”
डायरेक्ट अँटेरिअर पद्धतीमध्ये मांडीच्या पुढच्या बाजूने चीर दिली जाते. ही चीर फार मोठी देण्याची गरज नसते. यामुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारण्यास मदत होते. लहान चीर द्यावी लागत असल्याने स्नायूंचे नुकसान होण्याचीही शक्यता कमी असते. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि शस्त्रक्रियेत फार गुंतागुंतही होत नाही. यामुळे रुग्णाची सगळ्या त्रासातून मुक्तता होण्यास मदत होते आणि तो लवकर मोकळा श्वास घेऊ शकतो.

सिंगल स्टेज डायरेक्ट अँटेरिअर बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये एकाचवेळी दोन्ही खुब्यांचे प्रत्यारोपण होत असल्याने ही शस्त्रक्रिया पूर्वीच्या शस्त्रक्रियांच्या तुलनेत फार खर्चिक होत नाही. यामुळे रुग्णालाही आर्थिक पातळीवर फार ओढाताण करावी लागत नाही. रुग्णाला रुग्णालयाच्या फार फेऱ्या माराव्या लागत नाही आणि तो लवकर बरा होतो. यामुळे रुग्णालयात बरेच दिवस राहण्याचा, येण्या-जाण्याचा खर्च आटोक्यात राहतो.

“सिंगल स्टेज डायरेक्ट अँटेरिअर बायलॅटरल टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या सामाजिक आयुष्यावरही सकारात्मक परिणाम होण्यास मदत होते. असे डॉ बाजवा यांनी सांगितले. अँकलोजिंग स्पाँडीलॉसिस असो, फ्रॅक्चर आर्थरायटीस असो डॉ. बाजवा हे खुब्याच्या विकारासाठी डायरेक्ट अँटीरिअर अॅप्रोचने शस्त्रक्रिया करणारे मुंबईतले एकमेव डॉक्टर आहेत. अँकलोजिंग स्पाँडीलॉसिसने ग्रासलेल्या व्यक्तींची संख्या बरीच आहे. अँकलोजिंग स्पाँडीलॉसिसमुळे या रुग्णांच्या हालचालीवर मर्यादा येतात आणि सर्वसामान्य जीवन जगण अवघत होतं. या नावीन्यपूर्ण प्रक्रियेमुळे आपण रुग्णांना लवकर बरे करत आहोतच शिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी करत आहोत. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळण्यास मदत होते” असे डॉ.बाजवा यांनी म्हटले आहे.