
मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला 8 लाख 56 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 7 ते 14 सप्टेंबरमध्ये खडकीत घडली. याप्रकरणी नामदेव भापकर (वय 47, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव यांना व्यवसाय करण्यासाठी एखाद्या कंपनीची फ्रँचायझी हवी होती. त्यासाठी ते ऑनलाईनद्वारे शोध घेत होते. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन त्यांचा विश्वास संपादन केला. साबर चोरट्याने मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रँचायझी देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यासाठी सायबर चोरट्याने नामदेव यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईनद्वारे रक्कम बँकखात्यात वर्ग करुन घेतली. तब्बल 8 लाख 56 हजार रुपये पाठवूनही फ्रँचायझी मिळत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शफील पठाण अधिक तपास करीत आहेत.

























































