लकी ड्रॉ करेल बॅंक खाते रिकामे, घरी पत्र पाठवून केली जातेय फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सणात विविध प्रॉडक्टवरच्या ऑफरच्या नावाखाली नागरिकांना लकी ड्रॉ असल्याचे भासवून बँक खात्यावर सायबर ठग डल्ला मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पूर्वी ठग ऑनलाइन फसवणूक करत होते. पण आता थेट ग्राहकांच्या घरी पत्रच पाठवून डल्ला मारत असल्याने ठगांची ही फसवणुकीची नवीन पद्धत असल्याचे समोर आले आहे. या ठगांनी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये काहींना अशा प्रकारे पत्र पाठवून प्रोसेस फीच्या नावाखाली चुना लावला आहे.

माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात घरबसल्या ऑनलाइन खरेदीकडे कल वाढत चालला आहे. ऑनलाइन खरेदीमुळे कंपन्या देखील ग्राहकांना सणवार, नवीन वर्षाच्या निमित्त प्रॉडक्टवर भरघोस सूट देतात. प्रॉडक्टवर सूट मिळणार याची जाहिरात पाहिल्यावर ठग हे फसवणुकीच्या वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात. सूट किंवा मोफत वस्तू देणार असल्याचे भासवून त्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. त्या मेसेजमधील लिंक उघडल्यावर त्या व्यक्तीची माहिती ठगांकडे जाते. नुकतेच सायबर ठगाने टाटा पंपनीला 150 वर्षं पूर्ण झाल्याने तुम्हाला गाडी मिळणार असून त्यासाठी लकी ड्रॉमध्ये भाग घ्यावा लागेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता दिवाळी सणाच्या अनुषंगाने ठगांनी लकी ड्रॉच्या नावाखाली चुना लावण्यास सुरुवात केली आहे.

अॅमेझॉनच्या नावाचा गैरवापर

अॅमेझॉन या पंपनीच्या नावाचा गैरवापर करत ऑनलाइन शॉपिंग लकी ड्रॉच्या नावाखाली महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये नागरिकांना घरी पत्र येत आहेत. त्या पत्रासोबत एक कुपन पाठवले जाते. लकी ड्रॉमध्ये विजेत्याना 1 ते 10 लाख रुपये मिळणार असे सांगून 09088501354 या नंबरवर पह्न करण्यास भाग पाडले जाते. तर लकी ड्रॉच्या मोहात नागरिकदेखील त्या नंबरवर पह्न करतात. पह्न केल्यावर त्यांना प्रोसेस फीच्या नावाखाली बँक खात्यातून पैसे काढले जातात. अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे.

”अॅमेझॉनच्या लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. त्या लकी ड्रॉच्या कुपनखाली असलेला नंबर हा पश्चिम बंगालचा असल्याचे उघड झाले आहे. त्याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांना संपर्क साधण्यात आला आहे. लकी ड्रॉच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होऊ नये. अशी पत्रे आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा.”

  • डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त सायबर (मुंबई पोलीस)