मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या वतीने 27 फेब्रुवारीला दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुंबईसह महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी ‘माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान’ या विषयावर 1200 शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली. त्याचबरोबर मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी 48 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

महाराष्ट्रातल्या कोसकोसावर बदलणाऱया अनेक बोलीभाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेडय़ापाडय़ातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते.

बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱयांनी लेख लिहावा अशी अपेक्षा आहे. पहिल्या पाच जणांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. युनिकोड फाँटमध्ये टाईप करून 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत लेख [email protected] यावर पाठवावेत तसेच स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक राजन देसाई-8779983390 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.