
सामना प्रतिनिधी । धाराशिव
टाटा व कोयणा धरणातील वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 116 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेती व पिण्यासाठी देण्यात यावे. अशा मागणीचा ठराव येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार्या धाराशिव नगर परिषदेच्या बैठकीत घेऊन तो शासनास पाठविण्यात येणार असल्याची माहिती धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
टाटा व कोयणा धरणातील वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 116 टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर समुद्रात सोडले जाते. समुद्रात सोडण्याऐवजी ते पाणी मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि पिण्यासाठी देण्यात यावे या मागणीसाठी सोमवापासून फोन आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनास मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा टाटा व कोयणा धरणातील समुद्रात सोडण्यात येणारे 116 टीएमसी पाणी मराठवाड्यातील शेती तसेच पिण्यासाठी देण्यात यावे अशा आशयाचा ठराव दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या धाराशिव नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. सदरील ठराव शासनासही पाठविण्यात येणार आहे.
मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त असून टाटा व कोयणा धरणातील पाणी मराठवाड्यास मिळाले तर मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे. तेव्हा हे पाणी मराठवाड्यास देण्यात यावे या मागणीचा ठराव जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदा व नगर पंचायतींनी घ्यावा तसेच जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायतीनी अशा असे ठराव आपआपल्या बैठकीत घ्यावेत व ते शासनास सादर करावेत, तसेच या जिल्ह्यात असणार्या सामाजिक संस्था व संघटना यांचेही या जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान आहे. तेव्हा अशा संस्था व सामाजिक संघटनानीही टाटा व कोयणा धारणतील 116 टीएमसी पाणी मरावाड्यास देण्याबाबचे ठराव घ्यावेत व ते शासनास सादर करावेत असे आवाहनही नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
























































