मुंबई पोलीस दलात साडेतीन हजारांहून अधिक पदे रिक्त; बंदोबस्तासाठी सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
over-3500-posts-vacant-in-mumbai-police-msf-jawans-deployed-for-security-bandobast

राज्यात पोलीस दलात भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते असले तरी प्रत्यक्षात मुंबई पोलीस दलात साडेतीन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलातील अपुऱया मनुष्यबळामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात अनेक पदे रिक्त असल्याने या पदांची नियमित भरती होईपर्यंत सुरक्षा मंडळाचे सुमारे तीन हजार जवान पोलीस दलाला मदत करणार आहेत.

मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदारांची सद्यस्थितीत एकूण मंजुर संख्या 41,966 असून त्यापैकी 38,080 पोलीस प्रत्यक्षात कार्यरत आहेत. उर्वरित सुमारे 3886 पोलीस अंमलदाराची पदे रिक्त आहेत. आगामी पोलीस भरतीमध्ये या रिक्त पदांपैकी 3521 पदे भरण्यात येणार आहेत, तर उर्वरित पदे त्यानंतरच्या भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदामुळे तसेच पोलीस भरतीची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने 3886 एवढय़ा पदांची पुढील एक वर्षभर कमतरता भासणार आहे.

सध्या सुरू असलेल्या आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर येणाऱया काळात भारतात खनिज तेल, नैसर्गिक गॅस व तत्सम जीवनोपयोगी साधनसामुग्रीचा तुटवडा झाल्यास उद्भवणाऱया प्रतिकूल परिस्थितीला शासनास सामोरे जाण्याची शक्यता असल्याने सध्याचे उपलब्ध पोलीस मनुष्यबळ अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस दलाअंर्तगत चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असल्याने या पोलीस ठाण्यात एकूण 1328 पोलीस अंमलदाराची पद निर्मिती केली आहे. ही पदे आगामी पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात एक वर्षभर त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या नवीन पोलीस ठाण्यास इतर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने मुंबई पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता पोलीस दलावरील ताण कमी करण्यासाठी वर्षभरासाठी पोलीस आयुक्त कार्यालयास एकूण 3000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची हद्द मडुरे स्थानकापर्यंत असून या रेल्वे मार्गावर पनवेल रेल्वे स्थानक ते रोहा रेल्वे स्थानकादरम्यान एकूण 6 रेल्वे स्थानके असून ती पनवेल रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत आहेत. रोहा रेल्वे स्थानक ते राजापूर रोड रेल्वे स्थानकादरम्यान एकूण 27 रेल्वे स्थानके असून ती रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या मार्गावर दररोज 70 रेल्वे प्रवाशी ट्रेन व 40 मालवाहू ट्रेन धावत आहेत.

मुंबई लोहमार्गासाठी 200 सुरक्षा रक्षक

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ व भाईंदर या 4 लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निर्मितीस व त्यासाठी एकूण 279 पदांची निर्मिती करण्यास व शासनाने मान्यता दिली आहे. या चारही लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या इमारतीसाठी आवश्यक असलेल्या जागा संबंधित रेल्वे प्रशासन अधिकाऱयांशी समन्वय साधून उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांकरिता इतर लोहमार्ग पोलीस ठाणी व मुख्यालय येथून तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.