
शिक्षण, आरोग्य, समाजकारण आणि राजकारण यात आपले अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कसबाबावडा येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने अनेक संस्थांचे आधारवड, शिक्षण आणि समाजकारणातील दीपस्तंभ हरपल्याची भावना सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, उद्या सायंकाळी चारच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज लाईन बाजार येथून अंत्ययात्रा निघणार आहे. पॅव्हेलियन मैदानात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक कार्य
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे या विचारातून डॉ. डी. वाय. पाटील यांनी ऐतिहासिक कार्य केले. एका छोटय़ा शाळेपासून सुरू केलेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नवी मुंबईसह देशाच्या विविध भागांत डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण, व्यवस्थापन यासह विविध महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे दोनशे संस्था, आठ विद्यापीठे असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियमची त्यांनी उभारणी केली. समाजसेवा, शिक्षण क्षेत्रातील प्रचंड योगदानाची दाखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.
राज ठाकरे यांनी घेतले अंत्यदर्शन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा बावडा येथे जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सतेज पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांचे त्यांनी सांत्वन केले.
सोनिया गांधी यांच्याकडून सांत्वन
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी आमदार सतेज पाटील आणि डॉ. संजय डी. पाटील यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही संवेदना व्यक्त केल्या.
दूरदर्शी व्यक्तिमत्व गमावले – शरद पवार
शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत डी वाय पाटील यांनी केलेले अचाट कार्य अनेक पिढय़ांना प्रेरणा देणारे आहे. समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याची त्यांची तळमळ कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
कार्यतपस्वी नेतृत्व हरपले – देवेंद्र फडणवीस
शिक्षण, समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले ‘पद्मश्री’ डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने कार्यतपस्वी नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. ‘ज्ञानदेव’ या आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी ज्ञानाची आराधना केली.
लोकाभिमुख नेता – मल्लिकार्जुन खरगे
डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ञ, लोकाभिमुख नेता आणि समाजसेवक गमावला आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक होते. तळागाळातील लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्यपाल या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचला. हा प्रवास त्यांच्या निष्ठा, नम्रता आणि समाजकल्याणाप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा साक्षीदार आहे, अशा भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केल्या.
त्यांचे कार्य अविस्मरणीय – राहुल गांधी
माजी राज्यपाल, शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्य केल्या.
नगरसेवक ते राज्यपाल
कसबाबावडा येथे 22 ऑक्टोबर 1935 रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला. वडील यशवंतराव आणि आई वत्सलाताई यांनी दिलेल्या परंपरेतील संस्कारात ते घडले. शिवाजी विद्यापीठातून पदवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अवघ्या 19व्या वर्षी कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. कोल्हापूर नगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक, त्यानंतर महापौर म्हणून त्यांनी विकासाच्या अनेक योजना राबविल्या. 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा-गगनबावडा मतदारसंघातून ते दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले. 2009 ते 2014 या काळात त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. राज्यपाल असताना त्यांनी अवघा एक रुपया मानधन घेतले होते.






























































