
सामना प्रतिनिधी । पैठण
पैठण – मुंबई ‘शिवशाही’ बसगाडीला सोमवारी आमदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी सजविलेल्या या बसगाडीची आमदार भुमरे यांच्यासह शिवसैनिकांनी वाजतगाजत शहरातून मिरवणूक काढली.
सायंकाळी ७ वाजता पैठण बसस्थानकावरून ही शिवशाही बस नगर, पुणेमार्गे मुंबईकडे मार्गस्थ झाली. या बसगाडीला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केल्यावर आमदार संदिपान भुमरे म्हणाले की, ‘परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बस सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. कारण पैठण हे शहर प्राचीन तीर्थक्षेत्र व आधुनिक पर्यटनस्थळ आहे. येथे एमआयडीसी आहे. महाराष्ट्राचे सौभाग्य लेणे असलेल्या महावस्त्र ‘पैठणी’ची निर्मिती येथे केली जाते. मोठी व्यापारपेठ येथे आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापारी व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मुंबईकडे जाणाऱ्या बसची नितांत गरज होती. आणखी एक शिवशाही बसगाडी पैठण आगाराकडे येणार असून, पैठण – पुणे या मार्गावर ती धावणार आहे.
दरम्यान, सजविलेल्या या शिवशाही बसची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार संदिपान भुमरे हे मिरवणुकीच्या अग्रभागी होते. बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, परदेशीपुरा, मुख्य बाजारपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, नाथ मंदिर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, नगरसेवक तुषार पाटील, ईश्वर दगडे, भूषण कावसानकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

































































