
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसचारा उफाळून आला आहे. त्यांच्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर इमरान खान यांची अटक बेकायदा असून त्यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने इमरान यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला आहे. इमरान खान यांची अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. इमरान यांना अटक करण्यापूर्वी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारची परवानगी घ्यायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने लष्करला फटकारले. एखाद्याला अशा प्रकारे अटक करता येईल का? एनएबीने कायदा मोडून न्यायालयाचा अवमान केल्याचे पाकिस्तानचे सरन्यायाधीश म्हणाले. आता यापुढे एनएबी काय करते ते न्यायालयाचे लक्ष असेल, असेही सांगण्यात आले.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने शाहबाज शरीफ सरकारवर कडक ताशेरे ओढले. न्यायालयाने पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलला सुनावणीदरम्यान पाचारण केले. आम्ही न्यायालयाचा सन्मान परत मिळवू, असे सरन्यायाधीश म्हणाले. अशाप्रकारे अटक होत राहिल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


























































