
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील वाद शमण्याचे नाव नाही. पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात त्यांच्या देशाचा झेंडा लावून सराव केल्याचा वाद संपत नाही तोच आता वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने नवा वाद ओढवून घेतला आहे.
शनिवारी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. या दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने भर मैदानात हीन कृत्य केले. फलंदाजाने षटकार ठोकल्याचा राग आल्याने शाहीन याने रागाच्या भरात फलंदाजाला चेंडू फेकून मारला. यानंतर त्याने माफीही मागितली मात्र चेंडू लागल्यामुळे बांगलादेशचा फलंदाज जमिनीवर पडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं?
ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली. बांगलादेशच्या डावातील तिसरे षटक पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी टाकण्यासाठी आला. त्याच्यासमोर बांगलादेशचा फलंदाज अफीफ हुसैन उभा होता. या षटकात अफीफ याने शाहीन आफ्रिदी याला उत्तुंग षटकार ठोकला. यानंतरचा दुसरा चेंडू अफिफ याने जपून खेळला. हा चेंडू घरंगळत शाहीनकडे गेला. आधीच्या चेंडूवर षटकार ठोकल्यामुळे शाहीन संतप्त झाला होता. घरंगळत आलेला चेंडू शाहीनने उचलला आणि रागाच्या भरात अफिफ याच्या अंगावर फेकला. चेंडू जोरात लागल्यामुळे अफिफ जमिनीवर कोसळला. यानंतर शाहीनने माफी मागितली, तसेच पाकिस्तानी खेळाडूही अफिफजवळ आले आणि त्याची चौकशी करू लागले.
Gets hit for a 6 and Shaheen Shah loses his control next ball!
I get the aggression but this was unnecessary. It was good however that he went straight to apologize after this.#BANvPAK pic.twitter.com/PM5K9LZBiu
— Israr Ahmed Hashmi (@IamIsrarHashmi) November 20, 2021




























































