इतरांना मदत,माझ्या कारखान्याला छदामही नाही; पंकजा मुंडे यांचा सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई करत सुमारे 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून आर्थिक अडचणीत असलेल्या इतर काही कारखान्यांना सरकारकडून मदत मिळाली; पण माझ्या कारखान्याला छदामही मिळाला नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मी आर्थिकदृष्टय़ा प्रचंड तणावातून जात असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी कारखान्याच्या आर्थिक समस्येवरही भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपले तब्बल नऊ किलो वजन कमी झाल्याचे त्या म्हणाल्या. मी दररोज बँकांच्या पाया पडतेय अशी व्यथाही त्यांनी मांडली.

माझी सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर मी काहीच बोलले नाही तर कसे होईल? दरवेळी मी अत्यंत सभ्य, समजूतदार आणि प्रगल्भ असल्याची भूमिका घ्यायची; पण काही तथ्ये सांगावीच लागली. काही महिन्यांपूर्वी जीएसटी विभागाने कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी मी स्वतः माझी माणसे पाठवून कार्यालय उघडले आणि संबंधित अधिकाऱयांना सर्व कागदपत्रे दाखवली. त्यांना ज्या आकडय़ांबाबत शंका होती त्यात कुठल्याही प्रकारची तफावत आढळली नाही, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.

…म्हणून मी अस्वस्थ

पंकजा मुंडे यांनी बीड येथील सभेत, राजकारण गढूळ झाले आहे. मी तुरटीचे काम करीन असे विधान केले होते. या विधानाबद्दल त्या म्हणाल्या, हा माझा जिल्हा आहे. येथे आमचा मुख्य शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस होता. आता येथे प्रत्येकाला वाटते, माझे काय होणार? प्रत्येकजण माझ्याकडे येऊन तक्रार करतो; पण मी प्रत्येकाला वेगळे बोलवू शकत नाही. त्यामुळे मी बीडमधील सभेतून लोकांना उद्देशून म्हटले, वातावरण गढूळ आहे. यात मी तुरटीचे काम करेन. तुम्ही चिंता करू नका. लोकांना आश्वस्त करणारा नेता हवाय. अस्वस्थ करणारा नको, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच मी वन मॅन आर्मी आहे म्हणून अस्वस्थ आहे, असेही त्यांनी सांगितले.

विशिष्ट कारखान्यांना मदत

हे खरे आहे की, आम्हाला आधी शेतकऱयांचे पैसे द्यावे लागले. आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. आजारी उद्योगांना मदत करायची हे सरकारचे धोरण नव्हते. काही विशिष्ट कारखान्यांना मदत केली गेली. माझ्याही कारखान्याकडून मदतीसाठी अर्ज केला होता; पण आम्हाला मदत मिळाली नाही, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.