पनवेल-कर्जत लोकलला हायकोर्टाचा हिरवा कंदील, खालापूर शाळेजवळ रेल्वे बांधणार 10 फूट उंच भिंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

पनवेल-कर्जत मार्गावरील लोकलचा मार्ग उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. या मार्गावर लोकलसाठी दोन नवीन ट्रॅक टाकले जात आहेत. या ट्रॅकमुळे खालापूर येथील एका शाळेला धोका होण्याची शक्यता होती.

भविष्यातील धोका टाळण्यासाठी शाळेने याचिका केली होती. न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. सोमेश्वर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. शाळा व्यवस्थापन व रेल्वेच्या अधिकाऱ्यानी संबंधित जागेची पाहणी केली.  शाळेजवळ रेल्वे ट्रॅक कशा प्रकारे टाकला जाईल याचा आराखडा रेल्वेने दिला. येथे दहा फूट उंच भिंत उभारली जाईल, अशी ग्वाही रेल्वेने दिली. त्यावर शाळेचे समाधान झाले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने शाळेची याचिका निकाली काढली.

अर्ध्या तासाचा वेळ वाचणार

या मार्गावर मध्य रेल्वेची एक मार्गिका आहे. येथे पाच स्थानके आहेत. आधी या मार्गावर लोकल धावत होती, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही लोकल बंद करण्यात आली. मात्र या मार्गावरून मालगाडय़ांची वाहतूक सुरू आहे. नंतर या मार्गावर लोकलसाठी दोन स्वंतत्र ट्रॅक टाकण्याचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार मध्य रेल्वेने काम सुरू केले. खालापूर येथील जे. एम. म्हात्रे धर्मादाय संस्थेच्या शाळेने याविरोधात याचिका दाखल केली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून नवीन ट्रॅकचे काम थांबले होते. आता हे काम सुरू होणार आहे. ही मार्गिका सुरू झाल्यास पनवेलहून कर्जतला थेट जाता येईल व त्यामुळे अर्ध्या तासाचा वेळही वाचेल, असा दावा रेल्वेने केला आहे.