पूर्णा तालुक्यात तीन हजार महिलांना मिळणार रोजगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात लवकरच ६७ कोटी रुपये खर्च करुन महिला सुतगिरणी उभारण्यात येणार आहे. या सुतगिरणीचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या गिरणीमुळे साडेतीन हजार महिला कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे.

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात उभारण्यात आलेल्या जयभवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या अर्थसहाय्यासाठीचा शासनाचा आदेश २ नोंव्हेंबर रोजी निघाला. त्यामुळे आता महिला सूतगिरणीच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर व परभणी तालुक्यातील नांदगाव खु. या गावांच्या शिवारात शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून जयभवानी महिला सहकारी सूतगिरणी उभारण्यास राज्याच्या मंत्रिमडळाने ९ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली होती. त्यामध्ये या सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. त्यानंतर आता या संदर्भातील अधिकृत आदेश २ नोव्हेंबर रोजी राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे.

या आदेशात जयभवानी महिला सहकारी सुतगिरणीला १०:३०:६० या नवीन आकृतीबंधाप्रमाणे शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. सहकार तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या या या सूतगिरणीकरिता भाग भांडवलाची योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सदरील सूतगिरणीने १ काटी २५ लाख ४० हजार रुपयांचे सभासद भागभांडव शासनाकडे २० जानेवारी २०१८ रोजी जमा केले आहे. २५००० स्पिंडलद्वारे सुत काढण्यात येणारी अद्यावत जर्मन तंत्रज्ञानावर आधारीत मशीनरी बसवण्यात येणार आहे. त्यानुसार शासनाने या सूतगिरणीस मंजुरी दिली आहे. यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर सूतगिरणीने आवश्यक त्या शासनाच्या मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदरील सहकारी सूतगिरणीचे भविष्यात आंतरराज्यीय रुपांतर करावयाचे असल्यास शासनाची पूर्ण देणी एकरकमी दिल्यानंतर परवानगी देण्यात येईल. सहकारी सुतगिरणीचया कार्यक्षेत्रात वाढ करावयाची झाल्यास सूतगिरणीचे स्थलांतर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. सहकारी सूतगिरणीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यक्षेत्रातील व नव्याने वाढणाऱ्या या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांचे आधारकार्ड सूतगिरणीच्या सभासदत्वाशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता सूतगिरणी उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाचे व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सुतगीरणी मंजूरी दिल्याबद्दल विशेष आभार मानले आहेत.