टीएमसी खासदाराची निर्मला सीतारमण यांच्या पोषाखावर आक्षेपार्ह टीका; संसदेत गदारोळ

आजपासुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात वादग्रस्त टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर संसेदत एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. सौगत रॉय यांनी अर्थमंत्र्यांच्या पोषाखावर टीका केली. यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रॉय यांना माफी मागण्यास सांगितले.

मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, एखाद्या ज्येष्ठ सदस्याने एखाद्याच्या वैयक्तिक पोषाखावर भाष्य करणे योग्य नाही. जोशी म्हणाले की, ‘ते (तृणमूलचे खासदार) कशाबद्दल बोलत आहेत? त्यांनी बिनशर्त माफी मागावी. हा महिलेचा अपमान आहे.’ दरम्यान सभापती ओम बिर्ला म्हणाले की, त्यांचे विधान सभागृहाच्या कार्यवाहीतून काढून टाकावे. सौगत रॉय हे पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार असून मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या