लोकलचं रिअल टाईम लोकेशन प्रवाशांना कळणार; नकाशावर लोकल थेट चालताना दिसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली लोकल नेमकी कुठवर आलीय हे मुंबईकरांना आता आपल्या मोबाईलच्या नकाशावर थेट ग्रीन (लोकल ) ठिपक्याच्या रूपात पुढे सरकताना दिसणार आहे. मुंबईकरांना मोबाईल अ‍ॅपवर ‘रिअल टाईम लोकेशन’ दिसणार असल्याने लोकलच्या प्रतिक्षेत असणार्‍या लाखो प्रवाशांना आपली लोकल नेमकी कुठल्या स्थानकावर पोहचली याचा ‘आंखो देखा हाल’ पाहता येणार आहे. तसेच आपला रोजचा मार्ग सिलेक्ट करून प्रवाशांना आपले स्थानक आले की डुलकीतून जागे करणारा ‘अर्लाम सेट’ देखील करण्याची सुविधा मिळणार आहे.

रेल्वेने यात्री मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘लाईव्ह लोकेशन’ हे नवे फिचर समाविष्ठ केले असून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते बुधवारी त्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रवाशांना लोकल नेमकी कुठपर्यंत पोहचली, किंवा ती लेट आहे का? हे समजण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग तंत्राचा वापर केला असून त्यासाठी लोकलमध्ये ‘जीपीएस डिव्हाईस’ बसविण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक लाहोटी यांनी सांगितले.

प्रवाशांना लोकल बिघाडाप्रसंगी अधिकृत माहिती देखील या अ‍ॅपमुळे मिळेल. तसेच त्यांचे स्टेशन आले की अलार्म देखील होईल असे ते म्हणाले. यात्री अ‍ॅपचा डाटा दर 15 सेकंदांनी ऑटो रिफ्रेश होणार असल्याने ट्रेनचे अपडेट केलेले लाईव्ह लोकेशन रिफ्रेश करताच मिळेल. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) इटी पांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

काय आहेत यात्री अ‍ॅपची वैशिष्ट्ये

इमर्जन्सीत वन टच ‘पॅनिक बटण’
बदललेले वेळापत्रक त्वरीत अपलोड
उपनगरीय लोकलचे भाडे सजमणार
मेल-एक्सप्रेससाठी ‘स्पॉट युवर ट्रेन’
‘पीएनआर स्थिती’ कळणार
स्थानकनूसार सुविधा पाहता येणार
रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक
स्टेशन अर्लाम अलर्ट सेट करणे
प्ले स्टोअर, अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध