
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकरवर अभिनेत्री पायल रोहतगी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे. उर्मिला काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. पायलने एक व्हिडीओ जारी करत उर्मिलावर टीका केली आहे.
Lok Sabha 2019 काँग्रेस प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी उर्मिलाची पंतप्रधानांवर टीका
एकेकाळी मी उर्मिला मातोंडकरची मोठी चाहती होती. एक महिला म्हणून राजकारणामध्ये प्रवेश करून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तिच्या निर्णयाचे कौतुक आहे. तसेच भविष्याबाबत ती स्वत: निर्णय घेत आहे याचेही कौतुक आहे. तिने आपल्या मर्जीने कश्मीरी मुलासोबत निकाह केला. त्यावेळी तिने अधिकृतरित्या आपले नाव बदलून मरियम अख्तर मीर असे ठेवले होते. उर्मिला स्वत: आपले निर्णय घेते ही चांगली गोष्ट आहे, परंतु मला फक्त एकाच गोष्टीवर हरकत असून ती चुकीच्या गोष्टी मांडत असून तिचा पक्षही (काँग्रेस) असे करत आला आहे. काँग्रेसने तिला तिकीट दिले असल्याने ती पक्षाला धोकाही देऊ शकत नाही हे रास्त आहे, असेही ती म्हणाली.
उर्मिलाच्या ट्वीटवरही आक्षेप
उर्मिलाने एक नवीन ट्विटर अकाऊंट तयार केले असून यात तिने खोटे बोलणार नाही, महात्मा गांधींच्या विचारधारेने प्रेरित होऊन राजकारणात आल्याचे म्हटले आहे. परंतु तिने धर्म परिवर्तन केले असून आता उर्मिला मातोंडकर म्हणून नाही तर मरियम अक्तर मीर आहे, असे तिने सर्वांना सांगायला हवे, असे पायल म्हणाली. तसेच निवडणूकही हिंदू म्हणून नाही तर मुस्लिम नावाने लढवण्याचा सल्लाही तिने उर्मिलाला दिला.
… आणि हे स्वत:ला महात्मा गांधींजींच्या विचारधारेचे बोलतात
उर्मिलाने एका ट्वीटमध्ये महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे मुर्दाबाद असे म्हटले आहे. हे चुकीचे असून जर तुम्ही महात्मा गांधीची विचारधारा मानत असाल तर तुम्हाला हे माहिती हवे की ते अहिंसेचे पुजारी होते. तुम्ही तर येथे गोडसे मुर्दाबाद लिहिले असून यात तुमचा तिरस्कार दिसून येत आहे. गोडसे वकील होते, हिंदू ब्राह्मण होते तुझ्या सारखे धर्मपरिवर्तन केलेले नाही, असेही पायल म्हणाली. तसेच गोडसे दहशतवादी नव्हते, राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे देशाचे तुकडे झाले हे त्यांना माहिती होते. गांधींची देशाचे तुकडे होण्यापासून वाचवू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही, असेही पायल म्हणाली. उर्मिलाच्या प्रत्येक ट्वीटमधून फक्त तिरस्कार दिसत असल्याचे मत पायलने मांडले आहे.




























































