
भाजपसोबत जे गेले ते राष्ट्रवादीचे असू शकत नाहीत. महाराष्ट्रात आणि बाहेरसुद्धा राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे जनतेला माहिती आहे, असा टोला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेसाठी शरद पवार हे जुन्नरला आले होते. त्या वेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी कोणाची या मुद्दय़ाकर बोलताना शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतात हे महत्वाचं आहे. काल किल्लारीत होतो. तेथे 20 हजार लोक होते. राज्यात सगळीकडे हे चित्र दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे कोणत्या गटात आहेत, हे स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जुन्नरमधून कोण उमेदवार असणार, या प्रश्नावर पवार म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि ज्या पक्षाचा मी संस्थापक आहे तो पक्ष आगामी निवडणुकांना एकत्रित सामोरे जाणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं जे सूत्र आहे त्यानुसार जुन्नरची जागा ही ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. जुन्नरमधील लोक सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत, असेही ते म्हणाले. अजित पवारांच्या बंडाबाबत विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे जनतेला माहिती आहे. लोक आमच्या बाजूला अनुकूल आहेत.
सत्तेला चिकटून राहिले की लोक निकाल लावतात
ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना जाऊन मिळाले, ही भूमिका योग्य नसून ही जनतेची फसवणूक आहे. ज्या वेळी संधी मिळेल तेव्हा जनता धडा शिकवेल. सत्तेला चिकटून राहण्याची वेगळी भूमिका घेतली की लोक निकाल लावतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा नामोल्लेख न करता लगावला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. जुन्नर येथून पुणेकडे जाताना शरद पवार यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आंबेगावला सभा होणार
राष्ट्रकादीच्या फुटीनंतर पहिली सभा शरद पवार हे आंबेगावमध्ये घेणार होते. पण त्यांनी येवला येथे सभा घेतली. त्याबाबत विचारले असता, आंबेगावला सभा होईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत वाद निर्माण करू नये, असे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत जुन्नर तालुक्यातून शरद पवार गटाचा चेहरा कोण असेल, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी निवडणुकांना अजून वेळ असल्याचे सांगितलं.
























































