मुंबईतील रेल्वे प्रकल्पबाधित झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार, केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई व आसपासच्या परिसरातील हजारो झोपडीधारक रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित झाले आहेत. या पात्र झोपडीधारकांचे रेल्वेकडून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

पश्चिम व मध्य रेल्वेच्या हद्दीतील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईतील खासदारांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. अधिवेशन संपल्यावर यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, मनोज कोटक, राजेंद्र गावीत व आमदार कालिदास कोळंबकर, निरंजन डावखरे, संजय केळकर उपस्थित होते.

मुंबईतील रेल्वे हद्दीतील झोपडय़ा व प्रकल्पबाधितांबाबत महाराष्ट्र शासन, एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका, म्हाडा यांच्याशी संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्यात रेल्वेच्या रिक्त भूखंडावर झोपडीधारकांचे पुनर्वसनाबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेऊन पात्र झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे राज्यमंत्री दानवे यांनी बैठकीत सांगितले.

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी, आंबोली, जोगेश्वरी व गोरेगाव येथील हजारो प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पश्चिम रेल्वेने केलेले नाही. अशाच प्रकारे पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक पात्र झोपडीधारक पुनर्वसनापासून वंचित असल्याकडे लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासन व संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.