लहान भावाच्या बायकोला शिवीगाळ करणे मोठ्या भावाच्या जिवावर बेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दारूच्या नशेत बायकोला शिवीगाळ केली म्हणून लहान भावाने मोठय़ा भावाला घरी बोलावून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोवंडीच्या घाटला येथे घडली. लादीवर सांडलेले रक्त व सुरी पुसून पुरावा नष्ट करण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र गोवंडी पोलिसांनी त्याला पकडले. गोवंडीच्या नागेश पाटीलवाडीतील सहजीवन नागरी सोसायटीत रवी अर्जुन दांगट (३७) हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी रवीने त्याचा लहान भाऊ अविनाश दांगट याच्या पत्नीला दारूच्या नशेत शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी अविनाशने शुक्रवारी रवीला घरी बोलावले. त्यानुसार रवी तिथे गेला असता दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या अविनाशने किचनमधील सुरीने रवीवर वार केले. त्यातच रवीचा मृत्यू झाला. गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, उपनिरीक्षक सूरज गायकवाड, अंमलदार संपत नाळे यांनी तपास करून रवीची हत्या करणाऱया अविनाशला बेडय़ा ठोकल्या.