संभाजीनगर मध्ये उद्यापासून प्लॅस्टिकबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी केली आहे. प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध २४ जूनपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाने दहा पथके स्थापन केली आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने उत्पादक आणि वितरकांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने मार्च महिन्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून आहे तो माल विकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. आता ही मुदत २३ जून रोजी संपत आहे. त्यामुळे राज्य सरकारने २४ जूनपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीस स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सहाय्यक आयुक्त नंदकुमार भोंबे यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर महापौर घोडेले म्हणाले, शहरातील एकूण कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण तब्बल ३० टक्के आहे. शहर प्लास्टिकमुक्त झाल्यास कचऱ्याची समस्याही काही अंशी सुटणार आहे. त्यामुळे शहरात २४ जूनपासून प्लास्टिकबंदीची कठोरपणे अमलबजावणी केली जाईल. नागरिकांनीही या कामी मनपाला सहकार्य करावे. शनिवारपासून प्लास्टिक वापरणारे, विक्रेते आणि उत्पादक असे तिघेही दंडास पात्र ठरणार आहेत. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाईल. प्लास्टिकबंदीसाठी वॉर्ड स्तरावर प्रत्येकी एक या प्रमाणे नऊ आणि केंद्रीयस्तरावर एक अशी एवूâण दहा पथके स्थापन करण्यात आली आहेत.