
दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी खास निळ्या रंगाचे जॅकेट घालून संसदेत पोहोचले. हे जॅकेट काही खास आहे. पुनर्नवापरासाठी पीईटी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून ते बनवण्यात आले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ते हिंदुस्थानच्या ऊर्जा सप्ताहावेळी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून हे जॅकेट दिले होते.
कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित हिंदुस्थान ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी सोमवारी गेले होते. हे जॅकेट इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे लक्ष्य ठेवले आहे. हीच जॅकेट पेट्रोल पंपावरील त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी आज उत्तर देतील. तत्पूर्वी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान आपली भूमिका अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दात मांडली. यावेळी त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, अदानींची संपत्ती अडीच वर्षांत 13 पटीने वाढली. 2014 मध्ये ते 50,000 कोटी होते, ते 2019 मध्ये एक लाख कोटी झाले. अचानक अशी काय जादू झाली की 12 लाख कोटी वाढले. फक्त मैत्रीमुळेच का? हिंडनबर्गचा अहवाल आहे जो ते (भाजप) स्वीकारत नाहीत. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी गरीबी, महागाई, बेरोजगारी, अदानी आणि अग्निवीर योजनेवरून केंद्रावर निशाणा साधला होता.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, काँग्रेस विदेशी अहवालांवर (हिंडनबर्ग रिपोर्ट) बोलत आहे. हा काँग्रेसचा मार्ग आहे. ते म्हणाले, ‘मी स्पष्टपणे सांगतो की, त्यांचेच नेते जे त्यांना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत, त्यांची संपत्ती बघा की 2014 मध्ये त्यांच्या नेत्याची संपत्ती किती होती आणि आज किती आहे’.

























































