दोषींना सोडणार नाही! मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींनी मौन सोडले

pm-modi-jacket

मणिपूरमधील 2 महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हिंसाचाराच्या आगीत धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत आणि या अमानवी घटनेबाबत मौन सोडले आहे. या घटनेबाबत दु:ख व्यक्त करताना मोदी यांनी म्हटले की. या महिलांसोबत झाले ते, कधीही माफ केले जाऊ शकणार नाही. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या प्रकारांमुळे माझ्या मनाला वेदना झाल्या असून मला चीडही आली आहे. अशा घटना सभ्य समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशाची बेईज्जती होत असून या घटनेमुळे देशातील 140 कोटी जनतेला शरमेने मान खाली घालायला लावली आहे.

पंतप्रधानांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत करावी. खासकरून आपल्या आया-बहिणींची अब्रू जपण्यासाठी कठोर पावले उचलावीत असे मोदी यांनी म्हटले आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेतील एकाही दोषीला सोडणार नाही हे आश्वासन मी देत आहे असंही मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर आपले मत मांडले. मणिपूरमध्ये मैतेई जमात आणि कुकी जमात यांच्यात वांशिक हिंसाचार उसळला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेमध्ये मैतेई जमातीतील लोकांनी कुकी जमातीच्या महिलांना पोलिसांच्या ताब्यातून जबरदस्तीने पळवून नेत त्यांना नग्न केले आणि त्यांची धिंड काढली. यानंतर त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब ही आहे की या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आले आणि ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.