महिनाअखेरपर्यंत पीएमसी बँकेचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल

284

आर्थिक घोटाळ्यांचा सामना करणाऱ्या पंजाब महाराष्ट्र बँकेचा फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत येईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली. तसेच बँकेची मालमत्ता विकून रक्कम उभारण्यात येणार असून अशा मालमत्तांचे मूल्यांकन सुरू असल्याचेही दास यांनी सांगितले. मॉनिटरिंग पॉलिसीच्या घोषणेनंतर पीएमसी बँकेबद्दल माहिती देताना गव्हर्नर दास म्हणाले, पीएमसी बँकेच्या मालमत्तांचे मूल्यांकन तज्ञांच्या मदतीने केले जात आहे. यासंदर्भात आरबीआय नियुक्त प्रशासक आणि मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, ईडी आणि आरबीआय अधिकारी यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल आणि बँकेच्या मालमत्तेचा आकडा मिळाला की पुढील कारवाई करण्यात येईल, असे दास यांनी सांगितले. सहकारी बँकांचे चांगल्या पद्धतीने नियमन व्हावे यासाठी या सेक्टरच्या नियमांमध्ये बदलाचा सल्लाही आरबीआयने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयकडून प्रीपेड पेमेंट कार्ड

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी प्रीपेड पेमेंट इंस्टुमेंट (पीपीआय) कार्ड लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कार्डचा वापर 10 हजार रुपयांपर्यंत वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी करता येणार आहे.

हे कार्ड ग्राहकांना बँक अकाऊंटद्वारे रिचार्ज करता येईल. बिल पेमेंटसाठीही वापरता येणार आहे. डेबिट कार्डद्वारेही ‘पीपीआय’चा रिचार्जचा पर्याय उपलब्ध असेल. एका महिन्यात रिचार्ज मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या