ईडीला न्यायालयाचा झटका, आर्थिक अफरातफर प्रकरणी अभिनेता सचिन जोशी दोषमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता-व्यावसायिक सचिन जोशीविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करणाऱ्या ईडीला मंगळवारी विशेष न्यायालयाने झटका दिला. न्यायालयाने जोशीला दोषमुक्त केले आहे. तसेच त्याचा जप्त केलेला पासपोर्टही तातडीने परत करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना याआधी दोषमुक्त केलेले आहे. त्याआधारे सचिन जोशीच्या दोषमुक्ततेचा अर्ज स्वीकारत असल्याचे विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी स्पष्ट केले.

आर्थिक अफरातफर प्रकरणात सचिन जोशीला ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर ईडीच्या विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र ईडीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. त्यावर जोशीने पुन्हा जामिनासाठी दाद मागितल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी मुख्य आरोपी ओमकार ग्रुपचे एमडी बाबूलाल वर्मा, अध्यक्ष कमलकिशोर गुप्ता यांना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.