चोरीचे टायर घेऊन जाणारा ट्रक पकडला, आठ लाखांचे टायर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अर्धापूर

चोरी केलेले आठ लाख रुपायांचे ट्रकचे चाळीस टायर घेऊन जाणारा ट्रक वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाने नांदेड-हिंगोली महामार्गावर पकडून नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 मार्चरा रात्री एस.आर कॉम्प्लेक्स लातूर फाटा धनेगांव येथील दुकानाचे शटर तोडून अज्ञातांनी 8 लाख 54 हजार 200 रुपायाचे विविध कंपन्यांचे चाळीस टायर चोरी झाल्याची फिर्याद मारोती प्रतापराव शिंदे (रा.कौशल्य नगर धनेगांव) यांनी शनिवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक कछवे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु असतानाच वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरुन सहकाऱ्यांना सोबत घेऊन नांदेड-हिंगोली रोडवरील राजहंस मंगल कार्यालयासमोर ट्रक क्र.एम.एच.26 ए डी 0093 हा अडवून तपासणी केली असता यात चोरीचे टायर असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी दरम्यान ट्रक मधील दोन आरोपीपैकी सुखविंदरसिंग सत्तरसिंग गुल्लर रा. बुंगई कॉम्प्लेक्स नांदेड हा पळून जाण्यात यशस्वी झाला तर रणजितसिंग सरदुल सिंग रंधवा रा.शहिदपुरा नांदेड यास मुद्देमाल व ट्रकसह नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.