१ लाख ८१ हजार किमतीचे २४ मोबाईल जप्त, चार आरोपींना अटक

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड जिल्ह्यात चालाखीने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला असून, पकडण्यात आलेल्या तीन आरोपींकडून एक लाख ८१ हजार रुपयांचे २४ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

गेल्या सहा महिन्यापासून नांदेड शहर व जिल्ह्यात अत्यंत चालाखीने मोबाईल चोरी करुन अलगदपणे पसार होण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत अनेक मोबाईल धारकांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या सर्व तक्रारींचा अभ्यास करत या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने याबाबत तपास करण्यास सुरू केला.

मिळालेल्या माहीतीवरून पोलिसांनी आरोपी शेख सलीम शेख अब्दुल्ल रज्जाक (१८) रा.फारुखनगर, गणेश उर्फ गण्या गौतम घाते (१८) रा. गोविंदनगर, राहूल प्रदीप जाधव (१७) रा. शिवनगर व नितीन बाबूराव हंबर्डे रा. अमराबाद ता. अर्धापूर या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे २४ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. या मोबाईलची किंमत १ लाख ८१ हजार रुपये एवढी आहे. स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणाचा तपास करताना वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करुन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करुन चोरट्यांना गाठले आणि त्यांच्याकडून हे मोबाईल जप्त केले आहेत. नांदेड जिल्ह्यात व शहरात मोबाईल चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल असून, या प्रकरणात ही मोठी कारवाई मानली जाते.