
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पीएनबी बँकेत १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी सीबीआयने इंटरपोलकडे केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
इंटरपोलने १९२ देशांना नीरव मोदीबाबत माहिती देण्यास आणि त्याला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पीएमएलए न्यायालयाने नीरव मोदीच्या प्रर्त्यापणाला मंजुरी दिली आहे. तसेच इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावल्याने त्याला अटक झाल्यावर त्याच्या प्रर्त्यापणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ईडीने त्याच्याविरोधात मनी लॉण्डरिंग प्रकरणाखाली आरोपपत्र दाखल केले असून त्याच आधारावर प्रर्त्यापणाची मागणी केली आहे. सीबीआयने नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी जूनमध्ये इंटरपोलशी संपर्क केला होता. या प्रकरणात नीरवसह त्याची बायको, भाऊ आणि काका हेदेखील आरोपी आहेत. त्याचे काका मेहुल चोक्सी यांनी व्यापार आणि प्रकृती अस्वस्थाच्या कारण देत हिंदुस्थानात परतण्यास नकार दिला होता. त्याला फक्त ब्रिटननेच उत्तर दिले होते. नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती इंटरपोलच्या सेंट्रल डेटाबेसमध्ये २४ फेबुवारीला दाखल करण्यात आल्याचे सीबीआयने सांगितले. त्याचबरोबर सीबीआयने अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, बिसेल्स, सौदी अरेबिया आणि ब्रिटन या देशांशी पत्राद्वारे संपर्क साधला असून नीरव मोदीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती हिंदुस्थानला देण्याची विनंती केली आहे. नीरव मोदी जानेवारीपासून फरार असून रद्द झालेल्या पासपोर्टवर त्याने काही देशांचा प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे.




























































