राज्य सरकारची नियमावली असतानाही गणेशोत्सव मंडळांना वॉर्ड ऑफिस, पोलिसांच्या नियमावलीचा जाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची मंडळांनी तयारी केलेली असतानाच त्यांना आता पालिकेचे वॉर्ड ऑफिस आणि पोलिसांच्या स्वतंत्र नियमावलीचा जाच सहन करावा लागत आहे. परवानगीसाठी पालिका आणि पोलिसांकडे गेले असता मंडळांपुढे नवीन नियम ठेवले जात असून त्याचे कठोर पालन करण्याबाबत हमीपत्र घेतले जात आहे. त्यामुळे मंडळामध्ये मोठी नाराजी असून सरकारने नियमावली जाहीर केलेली असताना आता वॉर्ड ऑफिस आणि पोलिसांची नियमावली कशासाठी, असा सवाल करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.

गणेशोत्सव दहा दिवसांवर आल्याने पालिकेबरोबरच पोलिसांच्या परवानगीसाठी मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. तसेच सरकारने 29 जून रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्ष परवानगीसाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव येत असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. उपनगरातील साकीनाका पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव मंडळांना एक हमीपत्र दिले आहे. त्यात हार, फुले अर्पण करणार नाही असे हमीपत्र देण्यास मंडळांना सांगितले आहे. मात्र सरकारच्या परिपत्रकात असा कोणताही उल्लेख नाही. मग पोलिसांकडून अशा हमीपत्राची मागणी का केली जात आहे, सरकारची नियमावली आणि स्थानिक पातळीवरील नियमावलीत असा फरक का, असा सवाल नरेश दहिबावकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. तसेच सरकारच्या नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याची हमी दिल्यानंतरही वेगवेगळ्या पद्धतीने मंडळांवर दबाव टाकला जात असल्याने अनेक जण उत्सवातून माघार घेण्याच्या निर्णयापर्यंत आले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

धारावीत पालिकेची परवानगी असतानाही पोलीस मंडप आकारू देत नाहीत!

धारावीत गणेशोत्सवासाठी मंडप घालण्यास पालिकेकडून परवानगी मिळालेली असतानाही रस्त्यावरच्या गणेशोत्सव मंडळांना मंडप अकारू देणार नाही, असे धारावी पोलीस ठाण्याकडून स्थानिक पोलीस बैठकीत स्पष्ट केले आहे. तुम्हाला पालिकेच्या संकेतस्थळावर जायला कोणी सांगितले, तिथे काहीही लिहिले असले तरी धारावीसाठी आम्ही वेगळा नियम लावला असे सांगितले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करायचा, अशा प्रश्न मंडळांपुढे उभा राहिला आहे.

आर नॉर्थमध्ये अद्याप एकाही मंडळाला परवानगी नाही

महापालिकेच्या आर नॉर्थ विभागात प्रशासनाने अद्याप एकाही गणेश उत्सव मंडळाला परवानगी दिलेली नाही. प्रत्येक दिवशी तांत्रिक कारण देत परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच ऑनलाईन बैठकीत जुनेच प्रेझेंटेशन दाखवले जात होते, ही बाब वॉर्ड अधिकाऱयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

 गणेशोत्सव मंडळ परिसरात आम्ही जाहिराती लावणार नाही आणि लावल्यास आम्हाला तुम्ही दंड आकारू शकता, असे हमीपत्र पालिकेचा टी वॉर्ड विभाग (मुलुंड विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून घेत आहे. कोरोनामुळे गणेश मंडळांवर आर्थिक ताण आहे. तसेच महापालिकेने जाहिरातीबाबतचे धोरण स्पष्ट केले असून त्याचे वॉर्ड स्तरावर का पालन होत नाही, असा सवाल दहिबावकर यांनी केला आहे.

याबाबत स्पष्टता हवी
 सुरक्षित अंतर ठेवून बाप्पाचे दर्शन घेता येणार की केवळ ऑनलाईन दर्शनालाच परवानगी आहे.
 आरतीसाठी ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे का?
 व्यवसायिक जाहिरातींना पालिकेची परवानगी असताना पोलिसांचा विरोध का?
 ठराविक पोलीस ठाण्यांकडून हमीपत्रासाठी हट्ट का?
 हार, फुले आणण्यास परवानगी आहे का?
 विसर्जनासाठी पालिकेकडून दहा जणांना परवानगी असताना पोलिसांचा विरोध का?