प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी खळबळजनक व्हीडिओ आला समोर, मीनाक्षी शिंदेंचे पती राजेंद्र शिंदे यांनी मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचा पूर्णेकरांच्या मुलाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे ठाणे शहर विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मोठा दावा केला आहे. पूर्णेकर हत्या प्रकरणातील हेल्मेटधारी आरोपी राजेंद्र शिंदे असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. या प्रकरणी राम पूर्णेकर यांनी आरोपी निखिल यादवचा व्हिडीओही सामोर आणला आहे. राजेंद्र शिंदे आरोपी निखिल यादव याला बंदूक चालवायला शिकवतानाचा हा व्हिडीओ असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. तसेच राजेंद्र शिंदे आपल्या मूळ गावी मुळशी येथे आरोपींना घेऊन गेला होता. तिथे त्याने आरोपींना बंदुक चालवण्याचे ट्रेनिंग दिले, असे राम पूर्णेकर यांनी सांगितले. राम पूर्णकर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना संबंधित व्हिडिओही दाखवले.

राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला आहे. अजून किती पुरावे देऊ? पोलिसांनी आतातरी राजेंद्र शिंदे यांना अटक करावी. माझ्या वडिलांच्या हत्येला २२ दिवस झाले, अजून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक का झाली नाही? पोलिसांच्या हाती अजून काहीच कसे लागले नाही? मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मी न्यायाची भीक मागत असल्याचा संताप राम पूर्णेकर यांनी व्यक्त केला आहे.