मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या गुजराती बाप-लेकाला अटक

तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला सोसायटीत कार्यालय घेण्यास नकार देऊन उलट अरेरावीची भाषा करणाऱ्या ठक्कर बापलेकाची अखेर जिरली. मुंबईत राहून मराठी महिलेलाच जागा देण्यास विरोध करणाऱ्या प्रवीण आणि निलेश ठक्कर या मुजोरांना मुलूंड पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. न्यायालयाने दोघांना जामीन मंजुर केला.

मुलूंड येथील शिवसदन या सोसायटीच्या इमारतीत मराठमोळ्या तृप्ती देवरुखकर यांना कार्यालय भाडेतत्वावर घ्यायचे होते. मात्र त्या सोसायटीत राहणारे प्रवीण ठक्कर व निलेश ठक्कर यांनी देवरुखकर यांना विरोध केला. इतकेच नाही तर तुम्हाला जागा मिळणार नाही, काय करायचे ते करा अशी अरेरावीची भाषा केली. तृप्ती यांनी ठक्कर बाप-लेकाच्या मुजोरीविरोधात समाजमाध्यमातून वाचा फोडली. त्यानंतर हे प्रकरण चांगले चिघळले. सर्व स्थरातून ठक्कर बापलेकाच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. बुधवारी रात्रीच  मुलूंड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही जामीन मंजूर झाला.