गर्भवती सुनेसह सासूचा शॉक लागून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगांवकर । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे वीजेच्या तारेचा धक्का बसल्याने एका गर्भवती महिलेचा व तिच्या सासूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुनीत शंकर मोहुर्ले (२५) आणि शकुंतला मोहुर्ले (५०) अशी त्या मृत महिलांची नावे आहेत. सुनीता मोहूर्ले या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या तसेच त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे.

मारेगाव तालुक्यातील कुंभा गावात राहणाऱ्या सुनीता मोहूर्ले शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारात त्या कपडे वाळविण्यासाठी गेल्या असता त्यांचा चुकून विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार वीजेचा झटका बसला आणि त्या तारेला चिकटल्या. त्यावेळी बाजूला काम करीत असलेल्या त्यांच्या सासूला हा प्रकार दिसताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याच गडबडीत त्यांचााही तारेला स्पर्श झाला व त्यांनाही जोरदार वीजेचा झटका बसला. त्यानंतर त्या दोघींनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेत सासू,सूनेचा करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.