
डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले पाहता राज्य सरकार तज्ञांची समिती नेमणार आहे. ही समिती हे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णांचे नातेवाईक अनेकदा रुग्णालयाची तोडफोड करतात तसेच संबंधित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.
राज्यात डॉक्टरांवरील हल्ले वाढत असून हे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी तसेच डॉक्टरांच्या संरक्षणासाठी न्यायालयाने विशेष तरतूद करावी, अशी मागणी करत डॉक्टर राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली. त्या वेळी त्यांनी कोर्टाला सांगितले की, अशी घटना घडल्यास वैद्यकीय सेवा कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई केली जाते. सध्या ही तरतूद पुरेशी असून यातील त्रुटी तपासण्यासाठी तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ऐकून घेत याचिकेवरील सुनावणी 31 मार्चपर्यंत तहकूब केली.





























































