आरोग्य – पावसाळ्यातले मुलांचे आजार

Photo Courtesy - Canva.com

डॉ. सुरेश बिराजदार

पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू आणि यीस्ट संसर्ग वाढीसाठीसुद्धा उत्तम काळ असतो. या दिवसांमध्ये विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या ठराविक लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, उलटय़ा होणे आणि पोटात दुखणे यांचा समावेश आहे. डेंग्यूच्या बाबतीत ओटीपोटात दुखणे, सतत उलटय़ा होणे, सुस्ती आणि रक्तस्राव यासारख्या धोकादायक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. उघडय़ावरचे अन्न पदार्थ आणि दूषित पाण्यामुळेदेखील कृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमधील निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. पालकांनी आपल्या मुलाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पालकांनी पाळण्यासाठी टिप्स

पालकांनी चांगली स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा.

मुलांनी उकळलेले पाणी प्यावे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळावे. घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करावे आणि फळे तसेच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. परंतु ते वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करून घ्यावी. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च प्रथिनयुक्त आहार, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चा समावेश असलेल्या पदार्थांची निवड करावी. आवळा, संत्री, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करावा.

चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचन होऊ शकते. पालकांनी ही खात्री केली पाहिजे की त्यांचे मूल निरोगी अन्नाचे सेवन करत आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असते आणि ते नियमितपणे खाण्याचा प्रयत्न करावा.

साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण असल्याने, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फुलदाण्या, पुंडय़ाखालील पाणी, वॉटर कुलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाकून परिसर स्वच्छ आणि कोरडा राखण्याचा प्रयत्न करा.

(लेखक मदरहुड हॉस्पिटल, खारघर येथे नवजात शिशु आणि बालरोग तज्ञ आहेत)