
सामना ऑनलाईन, मुंबई
रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या खानपानसेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीने कंत्राटी तत्त्वावर बसविलेल्या वॉटर वेंडिंग मशीनचे पाणी आता महागले आहे. त्यामुळे आरओचे शुद्ध पाणी पिण्यासाठी आता एक रुपया जादा द्यावा लागणार आहे. तीनशे मिलीलिटरच्या पाण्यासाठी यापुढे एकऐवजी दोन रुपयांचा भुर्दंड पडणार आहे.
आयआरसीटीसीने सर्व रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या आहेत. या मशीनद्वारे प्रवाशांना ‘आरओ’चे शुद्ध बॅक्टेरियामुक्त पाणी माफक दरात विकले जाते. ब्रॅण्डेड कंपनीच्या बाटलीबंद पाण्याची किंमत जादा असल्याने अशा प्रकारे वॉटर वेंडिंग मशीनद्वारे शुद्ध पाणी मिळू लागल्याने ही संकल्पना लोकप्रिय होऊ लागली होती. मात्र लायसन्स फीच्या दरात वाढ केल्याने पाणी विकणाऱ्यांना तोटा होऊ लागल्याने दरात वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या 20 स्थानकांवर नुकत्याच 37 वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या होत्या. तीनशे मिलीलिटर पाण्याच्या ग्लासाची किंमत सध्या कंटेनरशिवाय एक रुपया होती ती आता दोन रुपये करण्यात आली आहे. तर कंटेनरमधून तीनशे मिलीलिटर पाण्याची किंमत दोन रुपये होती ती आता तीन रुपये करण्यात आली आहे.
तीनशे मिलिलिटरच्या पाण्याची किंमत
- कंटेनरशिवाय-1 रुपयाऐवजी 2 रु.
- कंटेनरसह-2 रुपयांऐवजी 3 रु.


























































