Lok Sabha 2019 देश संकटात, म्हणून घराबाहेर पडले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, प्रयागराज

चौकीदार हे श्रीमंत लोकांसाठी असतात, शेतकऱ्यांसाठी नाही अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी आज केली. देश आणि देशाचे संविधान संकटात असल्यामुळेच घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.

प्रयागराज ते वाराणसी असा तीन दिवसांचा बोटीमधून प्रवास करीत प्रियंका गांधी-वढेरा प्रचार करणार आहेत. या जलप्रवासात नागरिकांशी संवाद साधताना भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘चौकीदार’ मोहिमेवर त्यांनी टीका केली. काल बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना भेटले. त्यावेळी एक शेतकरी म्हणाला, चौकीदार हा श्रीमंत लोकांसाठी असतो, तो शेतकऱ्यांसाठी नाही. शेतकरी हे स्वतःचेच चौकीदार आहेत असे सांगून प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या  वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही पण उद्योगपतींना हजारो कोटी रुपये दिले. देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. देशाचे संविधान धोक्यात आल्यामुळे मला घराबाहेर पडण्याची वेळ आली. इतकी वर्षे मी घरातच होते असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची स्थिती गोंधळाची नाही. आम्ही केवळ भाजपविरोधात लढत आहोत असे स्पष्ट करताना त्यांनी मायावती यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.