
राज्यातील विविध भागांतून दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून 10 लाख रुपयांच्या 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याशिवाय चोरीच्या दुचाकींची खरेदी करणाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात वाहनचोरी प्रकरण उकलीतील सर्वाधिक मोठी कारवाई युनिट पाचने केली आहे.
अजय रमेशराव शेंड (32, रा. सहजपूर, ता. दौंड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. वाहन खरेदी करणारा यल्लाप्पा कृष्णात बेळ्ळे (34, रा. मु.नंदुर, पो. डोणगाव, सोलापुर) यालाही अटक केली आहे.
हडपसर परिसरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे युनिट 5कडून तपास करण्यात येत होता. अंमलदार पांडुरंग कांबळे आणि अमित कांबळे हे वारंवार सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. त्यांनी 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील 100 ते 120 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले असता, संशयित सोसायटीत शिरल्याचे दिसून आले. त्यानुसार, पथकाने सोसायटीत पाहणी केली असता, त्या ठिकाणी बेवारस पाच दुचाकी आढळून आल्या. त्यामुळे पथकाने सापळा रचून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या अजयला ताब्यात घेतले.
सराईत अजयने पुणे शहर पिंपरी- पुणे ग्रामीण हद्दीतून 13, बीडमधून 3, सोलापूरमधून धाराशीव आणि लातूरमधून प्रत्येकी 1 ,अशा 20 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. चोरीच्या दुचाकी इन्शुरन्स कंपनीच्या असल्याची बतावणी करीत तो सोलापूरमधील यल्लाप्पाला विकत होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, एपीआय कृष्णा बाबर, रमेश साबळे, दया शेगर, शशिकांत नाळे, अमित कांबळे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.
120 सीसीटीव्हींच्या फुटेजमुळे सराईत जाळ्यात
वाहनचोरी झालेल्या ठिकाणापासून पोलीस अंमलदार पांडुरंग कांबळे आणि अमित कांबळे यांनी 5 ते 7 किलोमीटर परिसरातील 120 सीसीटीव्हींचे फुटेज धुंडाळले. त्यावेळी सोसायटीत संशयास्पदरित्या एकजण शिरताना दिसला. पथकाने परिसरात पाळत ठेवून वाहन नेण्यासाठी आलेल्या सराईताला ताब्यात घेऊन भांडाफोड केला.
गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता
वाहनचोरीच्या अनुषंगाने विविध पथकांकडून वेळोवेळी तपासाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार हडपसरसह विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या सराईताची माहिती काढून युनिट पाचने आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
























































