Pune crime news शोरूम चालकाकडून खंडणी उकळणार्‍याला बेड्या, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

माथाडीच्या नावाखाली दोन लाखांची खंडणी उकळणार्‍या दोघांवर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून यातील एकाला अटक केली आहे. विमाननगर भागात प्लायवूडचा ट्रक खाली करण्यासाठी आरोपींनी अडथळा निर्माण करून शोरूम चालकाकडून ही खंडणी उकळली.

रिंवद्र उर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, मंगल सातपुते (रा. लोहगाव) या त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे विमाननगर परिसरातील फिनीक्स मॉलमधील शोरूमच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी त्यांनी ट्रकमधून प्लायवूड मागविले. मात्र, ससाणे आणि सातपुते यांनी संबंधीत ठिकाणी येवून ट्रकमधील माल खाली करण्यासाठी अडथळा निर्माण करून फि़र्यादींच्या कामगारांना माल खाली उतरवून दिला नाही. आम्ही येथील स्थानिक आहोत, असे म्हणत फिर्यादी यांच्याकडे आठ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती चेकव्दारे 2 लाख रुपये स्विकारले. यानंतर आणखी अडीच लाखांची मागणी केली जात होती. परंतु फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला. यानुसार खंडणी विरोधी पथकाने ससाणे याला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.