
आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून ड्रॉव्हरमधील आठ ते दहा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. गेल्या आठवड्यात (13 ऑक्टोबर) हडपसर भागात ही घटना घडली होती.
विक्रम व्यंकट राठोड (वय – 23, रा. उंड्री), परमेश्वर कामन्ना माने (वय – 27, रा. उंड्री), राजकुमार रमेश माने (वय – 21), नवनाथ दाजी जाधव (वय – 22), माधव निवृत्ती सुर्यवंशी (वय – 21), मारूती सायबन्ना जाधव (वय – 20, रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
13 तारखेला हडपसर भागातील हांडेवाडी रस्ता येथे छोटा हत्ती या वाहनातून आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याकडे आरोपींनी पैशाची मागणी केली. मात्र, व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला. या रागातून आरोपीने लोखंडी रॉडने मारहाण करत जबरदस्तीने गल्ल्यातील रोकड घेवून पसार झाले. याबाबत दाखल गुन्ह्यात वानवडी पोलिसांच्या पथकाने तपास करून सहा जणांना अटक केली. तर, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन तलवार, लाकडी दांडके, दुचाकी असा 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संतोष तानवडे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, राहुल गोसावी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.




























































