आमदार सुनील शेळके यांच्यासह सातजणांवर गुन्हा, आमदारांनी कट रचल्याचा फिर्यादीत आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळेगाव-दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (वय – 48) यांच्या खूनप्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांनी कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात शुक्रवारी (12 मे) भरदिवसा आवारे यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून सहाजणांच्या टोळक्याने निर्घृण खून केला. याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना गंगाराम आवारे (वय – 69) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर हे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक काम करत होते. ते राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच खटका उडत होता. गेल्या सहा महिन्यांपासून किशोर हे आमदार सुनील यांचा भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून जीवाला धोका असल्याबाबत सांगत होते. आमचे वाहनचालक प्रवीण ओव्हाळ यांना शेळके व त्याच्या साथीदारांनी यांच्या जातिवाचक शिवीगाळ केली होती. किशोर हे मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असत ही गोष्टी सुनील शेळके व सुधाकर शेळके यांना आवडत नव्हती. सुनील यांचे संतोषसोबत राजकीय वितुष्ट होते. किशोर हे संतोषला नेहमी मदत करत असे. त्यामुळे सुनील शेळके, सुधाकर शेळके हे किशोरवर चिडून असायचे. किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना दोन वर्षांपासून पूर्णपणे राजकीय विरोध केला आहे. त्यांच्या चुकीच्या कामाविरोधात वेळोवेळी निदर्शने केली आहेत. समाजमाध्यमांवरदेखील ही बाब टाकली होती. किशोर यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होऊन सुनील शेळके राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता, असे सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल, हे किशोरने आपल्याला सांगितले होते, असेही सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. किशोर यांचा खुनाचा कट आमदार सुनील शेळके, सुधाकर, शेळके, संदीप गराडे यांनी रचला. त्यांचे साथीदार श्याम निगडकर आणि तीन हल्लेखोरांनी आपापसातसंगनमत करून किशोर यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

पाच आरोपी गजाआड

आवारे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले, श्याम अरुण निगडकर (वय – 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव-दाभाडे), प्रवीण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय – 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय – 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप विठ्ठल मोरे ऊर्फ नन्या (रा. आकुर्डी) या चार आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, शनिवारी सायंकाळी श्रीनिवास व्यंकटस्वामी शेडगळ (वय – 41, रा. वराळे फाटा, तळेगाव- दाभाडे, मूळ- रेणुगंठा) या आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

दुचाकी पळवून नेणाऱ्या चौघांवर रॉबरीचा गुन्हा

आवारे यांचा खून केल्यानंतर आरोपींनी पळून जात असताना, बाजारपेठ परिसरात दोन व्यक्तींना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकी पळवून नेल्या. याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (12 मे) दुपारी दोनच्या सुमारास बाजार गल्ली तळेगाव-दाभाडे येथे घडली. विनोद पंढरीनाथ चव्हाण (वय – 38) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चव्हाण हे सुकट, बोंबील विक्रीचा व्यवसाय करतात. ते सुकट, बोंबील घेण्यासाठी तळेगाव- दाभाडे येथे आले होते. त्यांनी मारुती मंदिर चौकातून एटीएममधून पैसे काढले आणि सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या दुकानात सुकट, बोंबील खरेदी करण्यासाठी निघाले. त्यावेळी चारजणांनी चव्हाण यांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी पळवून नेली. तसेच, आरोपींनी अनिल तुकाराम जाधव यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी जाधव यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून नेली. घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ ही दुचाकी सोडून दिल्याचे आढळून आले.