आंबेगाव तालुक्यातील वळती येथील काटवान वस्तीत बिबट्याची दहशत संपलेली नाही. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. गेल्या 17 दिवसात चौथा बिबट्या येथे जेरबंद झाला आहे. अजूनही काटवान वस्ती, बिघे वस्ती येथे बिबट्यांचा संचार असून बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काटवान वस्ती आणि बिघे वस्तीत गेल्या 17 दिवसाच चार बिबटे जेरबंद झाले आहेत. गुरुवारी सकाळी पकडण्यात आलेल्या बिबट्या हा एक-दीड वर्षांची मादी आहे. याआधी 12 ऑगस्ट रोजी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर 18 ऑगस्टला बिबट्याचा बछडा आणि 25 ऑगस्टला तिसरा बिबट्या जेरबंद झालाहोता. त्यानंतरही या भागात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आल्यानंतर आणखी एक पिंजरा लावण्यात आला. त्यात सकाळी चारच्या सुमारास चौथा बिबट्या अडकला.
ही माहिती कळताच वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक बालाजी पोत्रे, ऋषिकेश कोकणे, संपत भोर, शरद जाधव, रेस्क्यू सदस्य विलास भोर, दत्तात्रेय राजगुरव, मनोज तळेकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.