पोलीस ठाण्यांच्या ‘पोस्टिंग’साठी फिल्डींग; आयुक्त मात्र ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहर पोलीस दलातील मागील जवळपास एक महिन्यापासून रिक्त असलेल्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारीपदी वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून ‘फिल्डींग’ लावली जात आहे. एकाच जागेसाठी काही जणांकडून तीन – तीन राजकीय पुढार्‍यांच्या फोनची रिंग वाजवली जात असून ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी मात्र ‘वेट अँड वॉच’ची सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेताच रितेश कुमार यांनी खात्याचा अंतर्गत आढावा घेतला आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांची माहिती घेत कुठल्या अधिकार्‍याने कोणत्या ठिकाणी आणि किती दिवस काम केले आहे, हे पडताळून पाहीले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातच मागील जवळपास एक महिन्यापासून शहरातील कोंढवा, वानवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची जागा रिक्त आहे. येथील वरिष्ठ निरीक्षक बदली होऊन गेल्याने या जागा रिक्त असून गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक दोन आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचा चार्ज देखील प्रभारी अधिकार्‍यांकडे आहे.

रिक्त असलेल्या जागेपैकी कोंढवा हे संवेदनशिल आणि ‘हेवी’ पोलीस स्टेशन समजले जाते. त्यामुळे शहरातील एक महत्वाचे पोलीस ठाणे म्हणून त्याकडे पाहीले जाते. या खालोखाल वानवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची जागा देखील रिक्त असल्याने याठिकाणी ‘संधी’ मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. मात्र, स्वच्छ प्रतिमा अशी ओळख असलेल्या आयुक्तांकडून सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यानंतरच कुठल्याही प्रकारची जमा बेरीज न होता अंतर्गत बदल होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक वरिष्ठ अधिकारी हे आयुक्तालयात ‘अटॅच’ आहेत.

काही जणांना तत्कालीन पोलीस आयुक्तांची बदली होण्यापुर्वी आयुक्तालयात नेमण्यात आले असून हे अधिकारी पुन्हा बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, पोलीस आयुक्तांच्या संपुर्ण फेरआढाव्यानंतरच कोणाची वर्णी कुठे लागते आणि कुणाला पायउतार व्हावे लागते हे पाहावे लागणार आहे.