पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टी उधळली, 100 तरुण-तरुणींना घेतले ताब्यात 85 लाखांचे ड्रग्ज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरालगतच्या तुळापूर परिसरातील एका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकली. यावेळी अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या रेव्ह पार्टीतून शंभरावर तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी गांजा, तंबाखूजन्य पदार्थ असा 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पार्टीचे आयोजक, फार्महाऊस मालक, बाऊन्सर, डीजे ऑपरेटर, लाईटिंग कर्मचारी, बार टेंडर आणि इतर कर्मचाऱयांसह एकूण 78 जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोजक यश राजा चौधरी, पैमन सैफ शेख, सैफ आसिफ सय्यद, सिद्धांत संतोष धुवाडी, दिशांत संतोष धुवाडी, अली रौफ पानसरे, फार्महाऊस मालक नरेंद्र सुंदरलाल चुग, सुरज चंद्रकांत पोकळे, आशीष राजेश रेड्डी यांच्यासह 78 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे पोलिसांना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूरमधील एका रिसॉर्टमध्ये विना परवाना पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे 15 अधिकारी आणि 65 पोलीस कर्मचाऱयांच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर छापा टाकला. त्यावेळी तिथे मोठय़ा आवाजात साउंड, मद्यपान आणि धांगडधिंगा सुरू असल्याचे आढळून आले. तपासात संबंधित पार्टीसाठी मिळालेला मद्य परवाना 6 जून रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंतच वैध असल्याचे उघड झाले. मात्र त्यानंतरही दारू पार्टी सुरू ठेवण्यात आली होती.

उच्चशिक्षितांचा सहभाग

या पार्टीत आयटी आणि अन्य क्षेत्रांतील उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा मोठा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशा प्रकारच्या पाटर्य़ा शहरालगतच्या ग्रामीण भागातील रिसॉर्टमध्ये आयोजित केल्या जात असल्याचेही या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

तुळापूर परिसरात पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे दारूसह काही तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले आहेत. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

– तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.