जॉगिंग करताना उचलला 150 टन कचरा! ‘प्लॅस्टिकमुक्त पुणे’साठी तरुणाची अनोखी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण हा पर्यावरणासाठी चिंतेचा विषय बनला आहे. प्लॅस्टिक प्रदूषणापासून पुणेकरांची सुटका करण्यासाठी विवेक गुरव या 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने नुकतीच ‘30 डेज चॅलेंज’ ही मोहीम हाती घेतली होती. या अंतर्गत गेल्या महिन्याभरात त्याने एकटय़ाने पुण्यातील रस्त्यांवरून सुमारे 150 टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली आहे. प्रदूषणमुक्तीसाठी त्याने रावबलेल्या या अनोख्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विवेक हा मूळचा कोल्हापूरातील जयसिंगपूरचा. सध्या तो पुण्यात वास्तव्यास आहे. 2014 पासून तो जॉगिंग करताना कचरा गोळा करतोय. आतापर्यंत त्याने सात वर्षांत मित्रांच्या मदतीने तब्बल 5 हजार टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला आहे. या उपक्रमाविषयी दैनिक ‘सामना’शी बोलताना विवेक म्हणाला, गावाकडील नद्या स्वच्छ असतात. मात्र आळंदीच्या एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजात शिकताना कॉलेजच्या मागील बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीची अवस्था पाहून मला वाईट वाटले.

या नदीच्या आजूबाजूला कचऱयाचे ढीग पसरले होते. काही मित्रांच्या साथीने मी रोज नदीच्या घाटावरील कचरा साफ करायचो. अशाप्रकारे आमचा हा उपक्रम सुरू झाला.

विवेकने ‘पुणे प्लॉगर्स’ नावाची टिम बनवली आहे. प्लॉगर्स म्हणजे जॉगिंग करताना कचरादेखील गोळा करणे. ही टीम दर शनिवारी नद्यांची आणि रविवारी टेकडय़ा, गडकिल्ल्यांच्या परिसराची स्वच्छता करते. पुण्यासह नाशिक, संभाजीनगर, नागपूर, लातूर अशा विविध भागांतील तब्बल 4 हजार तरुण सध्या त्याच्यासोबत या उपक्रमाशी जोडले आहेत.

संकलित केलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱयाचे वर्गीकरण करून त्यावर पुनर्पक्रिया केली जाते.त्यानंतर त्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात, असे त्याने सांगितले.