डायनासोरचा शोध ब्रम्हदेवाने लावला, पंजाबमधील संशोधकाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चंदीगड

पंजाब विद्यापीठातील एका भूगर्भ संशोधकाने डायनासोरबद्दल एक अजब दावा केला आहे. डायनासोरचा शोध ब्रम्हदेवाने लावला असून त्याचा उल्लेख त्यांनी वेदांमध्ये केल्याचे या संशोधकाने म्हटले आहे. प्राध्यापक अंशु खोसला असे त्यांचे नाव आहे.

या विश्वात जे काही घडत आहे त्याचे ब्रम्हदेवाला ज्ञान आहे. डायनासोरबद्दलही त्यांना सर्व माहित होते. म्हणूनच वेदांमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे. आता हा जीव विलुप्त झाला असून त्याच्या विकास व प्रजननामध्ये हिंदु्स्थानचे महत्वपूर्ण योगदान आहे.  असे त्यांनी म्हटले आहे. खोसला गेल्या 25 वर्षांपासून डायनासोरच्या निर्मिती व विकासावर संशोधन करत आहेत.  अमेरिका व ब्रिटीश लोकांनी वेदांच्या आधारावरच डायनासोरवर संशोधन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच डायनासोर 6.5 कोटी वर्षांपूर्वीच विलुप्त झाले होते. पण ब्रम्हदेवाने आपल्या आध्यात्मिक शक्तींच्या माध्यमातून डायनासोरबद्दल ज्ञान प्राप्त केले. डायनासोर हा शब्द संस्कृत मधून आला असून डिनो म्हणजे भयानक आणि सोर म्हणजे पाल असा होता असे खोसला यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील खेडा जिल्ह्यात डायनासोरचे अवशेष आपल्याला सापडल्याचेही खोसला यांनी सांगितले आहे. यावरूनच त्या जागेचे नाव राजासौरस नर्मदा ठेवण्यात आले असेही खोसला यांनी म्हटले आहे.