
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रांगा लागत आहेत. एकाच वर्षात तब्बल 29 हजार विद्यार्थी वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 92 हजारांवर गेली आहे. पालिका शाळांच्या माध्यमातून दिलेले दर्जेदार शिक्षण, अद्ययावत सुविधा आणि सामूहिक प्रयत्न याच्यामुळेच हे यश आले असल्याचे प्रतिपादन आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
जोगेश्वरी पश्चिम येथील प्रतीक्षानगर मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी पूर्व पूनमनगर मुंबई पब्लिक स्कूलमधील बास्केटबॉल कोर्टाचे लोकार्पण आणि दादर पश्चिम भवानी शंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पालिका शाळेतील दहावीतील सर्वोत्तम 25 विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रमासोबतच वरळी सी-फेस शाळेत खगोलशास्त्र प्रयोगशाळेचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, नगरसेवक अनंत (बाळा) नर, राजू पेडणेकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
360 जागांसाठी 700 अर्ज
दादरमध्ये अनेक प्रतिष्ठत शाळा असताना भवानी शंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये 360 जागा असताना प्रवेश घेण्यासाठी तब्बल 700 अर्ज आले. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे म्हणाले. या शाळेला नुकतीच बोर्डाची मान्यता मिळाली आहे. शाळेत अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, सर्व खोल्यांमध्ये डिजिटल फोटो आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वप्न सत्यात उतरत आहे!
दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा पालिका शाळांकडे वाढत आहे. पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत हे स्वप्न आता सत्यात उतरत असल्याचे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले. व्हर्च्युअल क्लासरूम, मानसिक आरोग्य, दंतचिकित्सा, करीअर काउन्सिलिंग अशा माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.





























































