विखे-पाटील एकटेच भाजपात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अन्याय झाला, घुसमट झाली अशी तक्रार करत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज काँगेस आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते तडक भाजपात गेले. भाजपात त्यांचा रीतसर प्रवेश झाला नसला तरी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्यावर मंत्रालयात जाऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि गुप्तगू केले. आपल्यासोबत अनेक जण येतील, असे पत्रकारांना सांगणारे विखे-पाटील एकटेच भाजपच्या तंबूत गेले! काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली. ते आमदार आपल्यासोबत येतील, अशी त्यांची अटकळ होती, पण ती फोल ठरली.

आमदाराकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आज एकटा राजीनामा देत आहे.  आता इतर आमदारांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे ते म्हणाले.विखे-पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे- पाटील यांनी राजीनामा सादर केला.