
देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या शेकडो आंदोलने सुरू असून लाखो लोक हक्कांसाठी आवाज उठवत आहेत. मात्र, हा आवाज एकाकी व विखुरलेला असल्यामुळे तो ऐकला जात नाही. व्यवस्थेच्या विरोधातील या आवाजाला बळ देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील सर्व छोट्या-मोठ्या आंदोलनांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राहुल यांनी ‘सत्याग्रह’ उपक्रम सुरू केला आहे.
‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करून राहुल गांधी यांनी आज ही माहिती दिली. जेन झी, शेतकरी, आदिवासी, दलित, ओबीसी, विद्यार्थी, महिला असे विविध घटक देशात आंदोलने करत आहेत. कोणी पेपरफुटीविरोधात, कुणी महागाईविरोधात तर कुणी आणखी कशाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक संघर्षाची स्वतंत्र कहाणी आहे, मात्र यातील बहुतेक लढे एकाकी आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर त्यांचा दबाव पडण्याऐवजी ही आंदोलने दबली जात आहेत. ‘सत्याग्रह’ या वेबसाइटच्या माध्यमातून या सर्व आंदोलनांना एका व्यासपीठावर आणले जाणार आहे.
कशी आहे वेबसाइट?
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह वेबसाइटवर एक फॉर्म देण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये फक्त सहा रकाने आहेत. त्यात व्यक्ती किंवा संघटनांना आपले नाव आणि मोबाईल क्रमांकासह त्यांच्या आंदोलनांची माहिती भरायची आहे. लोकांनी या आंदोलनातून काय बोध घ्यावा हेही थोडक्यात लिहायचे आहे. त्याशिवाय, आंदोलनांचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करायचे आहेत.
गरज असेल तिथे तुमच्यासोबत उभा राहीन!
‘महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे सत्य हे सर्वात मोठे शस्त्र आहे, पण सत्याच्या पाठीशी उभे राहणे हे त्याहूनही मोठे शस्त्र आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढत असाल तर तुमची संघर्षगाथा ‘सत्याग्रह’वर पाठवा. जेणेकरून तुमच्याप्रमाणे आणखी कोण-कुठे लढत आहे ते तुम्हाला कळेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी जनतेला केले आहे. ‘जिथे जिथे सत्य चिरडले जात असेल तिथे प्रतिकारासाठी उभे राहणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे कर्तव्य आहे. ‘सत्याग्रह’च्या माध्यमातून माझ्यापर्यंत येणाऱया आंदोलनांना मदत करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील. संसदेत, रस्त्यावर, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून जिथे जशी गरज असेल तिथे मी तुमच्यासाठी उभा राहीन, असा शब्दही राहुल गांधी यांनी दिला आहे.




























































